Posted by: nandan1herlekar | January 27, 2011

पंडितजींचे गाणे…महाकुंभमेळा


नन्दन हेर्लेकर
२४ जानेवारी २०११

पंडितजींचे गाणे…महाकुंभमेळा
अफाट ताकदीच्या जिगरबाज उस्तादी घरंदाजीच्या मस्तीत उघड आव्हाने देऊन गाणार्या गवयांचा विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत एक जमाना होता. ’खरे गाणे आपलेच’ असे म्हणुन आपल्या घराण्याचे नाक वरच राहिले पाहिजे, असा वरचढ पवित्रा ठेवणार्यांचा आणि प्रतिस्पर्धि गुणवान गायकाचा उपमर्द, तर कधि जीवघेणा प्रयोग करविणार्यांचाही तो जमाना होता. संगीतकलेचा उत्कर्ष होत असताना कलावंतांचाही उत्कर्ष होत असे. पण अशा हटवादी उस्तादांच्या आणि त्यांच्या चेल्यांच्या कुकर्मामुळे अन्य घराण्यांच्या उभरत्या कलावंतांच्या र्हासाचाही तो जमाना होता. राजघराण्यांचा आश्रय असणारा तो काळ संगीत घराण्यांच्याही उत्कर्षाचा होता. आपल्या घराण्याचे गाणे इतर कुणाही ’ऐर्या गैर्याच्या’ कानीही पडू नये म्ह णून अनेक क्लृप्त्या लढविणारे त्यातले उस्ताद शिष्याची पारखही अनेक वर्षे करीत. त्यांचा वेळोवेळी पाणउताराही करीत. ’सर्व प्रकारची’ सेवाही करुन घेत.
अशा काहीशा विचित्र वातावरणात राहून चिकाटीने, धैर्याने आणि समर्पणवृत्तीने ज्यांनी ज्ञान ग्रहण केले त्यात पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. भास्करबुवा बखले, पं रामकृष्णबुवा वझे यांचे नाव संगीताच्या इतिहासात फार मोठ्या मानाचे आहे. बाळकृष्णबुवानी देवजीबुवा, वासुदेवबुवा तसेच हद्दुखांसाहेबांचे चिरंजीव महम्मदखां यांच्याकडून मोठ्या कष्टाने गायन प्राप्त करून घेतले. या सर्व गुरुतही आपसात बेबनाव असताना. भास्करबुवांची कीर्ति अफाट होती. पण त्यांनी ज्या तीन महानुभावांकडून विद्या प्राप्त करुन घेतली ते तिन्ही उस्ताद वेगवेगळ्या घराण्यांचे होते. फैजमहम्म्दखां, नत्थनखां आणि अलादियाखां या श्रेष्ठांकडुन गायनकला प्राप्त करुन घेतलेल्या बखलेबुवांनी एका गुरूने अपमान केल्यावर त्यांच्याकडून मिळविलेल्या एकाही अंगाचा तसूभरही समावेश न करता अन्य दोन्ही गुरुंकडून प्राप्त झालेली विद्या त्यांच्या समक्ष भर सभेत सादर केली. हे थोरपण अन्यत्र कुठेही नाही. रामकृष्णबुवा असेच अनेक लहरी बादशहांकडे शिकले. उस्ताद निसार हुसेनखां, महम्म्दखां, सादिक अलीखां अशांकडे त्यांनी अनेक कष्ट सहन करुन अफाट विद्या मिळवली.
आमच्या जन्मापूर्वीच्या या गोष्टी आहेत. संगीताचा इतिहास जाणून घेताना यांचे दर्शन होते. पण आजच्या काळात अशी किती उदाहरणे आपल्याला दिसतात?
हा प्रश्न पडताच डोळ्यासमोर सरळ उभे राहतात स्वराधिराज पं. भीमसेन जोशी. लहान वयात गुरूच्या शोधात हिंडहिंडून, अनेक अपमान सहन करुन, प्रसंगी विनातिकिट प्रवास करुन ते जालंधर येथे पोचले. तिथल्या हरिवल्लभ संगीत सम्मेलनात गाण्यासाठी आलेल्या पं. विनायकबुवा पटवर्धनांनी त्यांची व्यथा जाणून त्याना योग्य गुरुचे नाव सुचविले. आपल्या गावाजवळच असलेल्या कुंदगोळ येथे पं. सवाई गंधर्वांच्या जवळ आपल्याला गाणे शिकायला मिळणार या आनंदाबरोबरच त्यांना आणखी एक मनस्वी आनंद मिळाला.
लहानपणी येता जाता ग्रामोफोनच्या दुकानात नित्यनेमाने ऐकू येणारा उ. अब्दुल करीम खांसाहेबांचा आवज त्याना वेडावुन सोडीत असे. असे आपल्याला गायचे आहे, ही दुर्दम्य इच्छा त्याना होत असे. सवाई गंधर्वांकडे त्याना ते मिळाले हा त्या आनंदाचा उत्तरार्धच!
भीमसेनजी श्रोत्यांसमोर प्रथम गायले ते आपल्य गुरूच्या षष्ठ्यब्दिप्रसंगी १९४६ साली. पुण्याच्या हिराबागेतला तो कार्यक्रम संगीतसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरानी लिहावा लागेल. ’भारतरत्न’ भीमसेनजींच्या उमेदीचा तो मैलाचा दगड होय. त्यावेळी ते मियामल्हार गायले. ते त्यांचे गायन ऐकताच त्याठिकाणी आलेल्या देशभरातील संगीतप्रेमीनी त्याना तात्काळ आमंत्रणे दिली. याच्क्षणी एका विलक्षण ताकदवान, बुद्धिमान आणि नादमधुर गायकाने अखिल हिंदुस्थानात आपली मुद्रा विराजमान केली.
याच काळात बेळगावातही त्यांचे गायन झाले १९४७-४८ साली. त्यवेळी येथे कर्नाटक म्युझिक सर्कल कार्यरत होते. रामदेव गल्लीतील कट्टी फोटो स्टुडिओच्या जागेत कार्यक्रम होत. हणमंतराव गुत्तीकर कामकाज पाहत. तबलावादक व्यंकण्णा कुप्पेलूर घरोघरी हिंडून एक एक रुपया मिळेल तसा गोळा करीत. जुने रसिक अजुनही ही आठवण सांगतात.
त्याच्प्रमणे आर्टस सर्कलने १९५२-५३च्या दरम्यान त्यांचे गाणे केले. बेळगावच्या जाणकार श्रोत्यांबद्दल त्याना आपुलकी असे. भीमसेनजीनी १९७८मध्ये ’संतवाणी’ गाण्यास आरंभ केला. विलक्षण लोकप्रियता लाभलेल्या या कार्यक्रमाला बेळगावात तीनही वेळा उदंड प्रतिसाद लाभला.
९ आक्टोबर १९८१ रोजी कलामंदिर येथे झालेला संतवाणीचा कार्यक्रम समस्त बेळगावकर रसिकांवर भक्तिरसाचा वर्षाव करुन गेला. बेळगावचे सुप्रसिद्ध गायक अनंत तेरदाळ यांच्या गंडाबंधन प्रसंगी म्हणजेच १२ मार्च १९८३ रोजी पंडितजींनी केलेले भाषण त्यांच्या गायनाइतकेच दिलखुलास होते. त्यावेळी त्यानी गाइलेला ’तोडी’ माझ्यासारख्या त्यावेळच्या उभरत्या गायकांच्या आणि असंख्य रसिकांच्यासाठी एक अवीट वस्तुपाठच होता.त्यानंतरही त्यांचे इथे कार्यक्रम झाले. प्रत्येकवेळचे आणि प्रत्येक ठिकाणचे त्यांचे गाणे म्हणजे महाकुंभमेळाच असे. महावीर भवनसारख्या मोठ्या सभागृहातसुद्धा उभे राहून ऐकण्यासाठी जागा मिळत नव्हती. अशी प्रभवळ असणारे हे व्यक्तिमत्व सूर्यदेवाच्या आराधनेदिवशी जन्माला आले हे महत्वाचे.प्रथम वर्णन केलेल्या संगीत वातावरणाचा विचार केल्यावर पंडितजींच्या थोरपणाचे महत्व नक्कीच कळेल. आजच्या काळात घराणेदार गाण्याची गुप्त विद्या इंटरनेट वा अन्य आधुनिक साधनांमुळे तितकी दुर्मिळ राहिलेली नाही. घ्रराणे ’जपण्या ’साठी त्यावेळसारखा अट्टाहास करणारी मंडळीही आज नाहीत. घरंदाजीच्या आधुनिकपणाची सुरुवात असण्याच्या काळात पं. भीमसेन जोशींच्या गायनाचीही सुरुवात झाली. ’एस्टब्लिश्ड’ घराणेदार गायकांच्या आणि तत्सम जिगरबाज उस्तादी परंपरेच्या छाताडावर बसून पंडितजीनी आपलेच एक ’खास’ घराणे बनविले. त्यांच्या दीपस्तंभाचे तेज ’विश्वंभर’ बनले आणि याकडे नजर टाकण्याची शक्ति मिळवु पाहणार्या त्यांच्या शिष्यानी त्यातील एक किरणतरी मिळावा यासाठी अहोरात्र मेहनत केली. जे साध्य झाले त्यातच इतिकर्तव्यता मानली.
अमर्याद शारीरिक शक्तीचे, ठाव न लागणार्या रागवैभवाचा शोध घेणार्या त्यांच्या ऊर्मीचे आणि सहजसुंदर बंदिशींच्या द्वारे उलगडणारे पंडितजींचे गाणे कुणी पेलतो म्हणून पेलणारे नव्हे. बैजु-तानसेन बद्दल माहित नाही, गंधर्वलोकीच्या स्वर्लोकीचेही ठाऊक नाही, पण तानपुर्याच्या घनगंभीर नादात आत्मचिंतनात मग्न झालेली ती ’भीमकाया’ प्रत्यक्ष पाहून आणि पुढे त्यांच्या स्वरधारेत ’कायावाचामने’ चिंब भिजून ज्यानी आपले जीवन धन्य केले, ते संगीत रसिक पंडितजींचे जन्मोजन्मीचे ऋणीच राहतील!

Advertisements

Responses

  1. I reasd this article respected nandanji.His assoiation with Belgaum was what I was in search of and was most appropriately recorded by you. Regards Suresh Kulkarni

    • Suresh ji, thanks for your comment. You please read one more article on the same page on Pt. Rambhau Bijapure and a brief history of music in Belgaum associated with him. Nandan


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Categories

%d bloggers like this: